नवी दिल्ली प्रतिनिधी : बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री नेहा शर्मा यांच्यासह अनेक नामवंत सेलिब्रिटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई, बंगाली अभिनेता अंकुश हाजरा, माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा तसेच माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची एकूण अंदाजित किंमत 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
ईडीच्या माहितीनुसार, सोनू सूद यांची सुमारे 1 कोटी रुपये, युवराज सिंग यांची 2.5 कोटी रुपये, नेहा शर्मा यांची 1.26 कोटी रुपये, मिमी चक्रवर्ती यांची 59 लाख रुपये, रॉबिन उथप्पा यांची 8.26 लाख रुपये, अंकुश हाजरा यांची 47 लाख रुपये आणि उर्वशी रौतेलाच्या आईची 2.02 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत अंतरिम आदेश जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित सेलिब्रिटींवर 1xBet नावाच्या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपचे प्रमोशन केल्याचा आरोप असून, प्रमोशनच्या बदल्यात मिळालेली रक्कम मनी लॉन्ड्रिंगद्वारे स्वीकारल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या प्रकरणात ईडीने यापूर्वीही चौकशी केली असून, काही काळापूर्वी माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची 11.14 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती.
दरम्यान, 1xBet ही 2007 साली सायप्रसमध्ये स्थापन झालेली ऑनलाइन बेटिंग कंपनी असून, ती जगभरातील क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्याची सुविधा देते. कंपनीचे ॲप आणि वेबसाइट 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी भारतात हे प्लॅटफॉर्म प्रतिबंधित आहे. या चौकशीत कंपनीवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि मोठ्या प्रमाणावर करचोरी केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.