हैदराबाद, वृत्तसंस्था
अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (22 डिसेंबर) अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आठ सदस्यांना अटक केली. त्यानंतर त्या सर्वांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
हैदराबाद येथील एका सिनेमागृहात पुष्पा २ अर्थात पुष्पा द रुल या सिनेमाचा प्रीमियर ४ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे आणि घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात आपला काहीही दोष नाही जे घडलं ते खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो असंही अल्लू अर्जुनने म्हटलं आहे. पण त्याच्याविरोधातला उद्रेक अजूनही पाहण्यास मिळतो आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी काही आंदोलक हे अल्लू अर्जुनच्या घरात घुसले आणि त्याच्या घराची तोडफोडही केली. तसंच अल्लू अर्जुनच्या घरावर टॉमेटो फेकले. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये द्यावेत, शिवाय शक्य आहे तेवढी सगळी मदत करावी अशा दोन मागण्या या सगळ्या सदस्यांनी केल्या. या प्रकरणात आठ सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबाद येथील ज्युबली हिल्स भागात अल्लू अर्जुनचं घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली. ज्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं आणि या सगळ्यांना पोलीस ठाण्यात नेलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन घरात नव्हता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे सगळे आंदोलक खूप संतापले होते असं पोलिसांनी म्हटलं आहे.