होळी म्हणजे रंगांची उधळण, आनंदाचा उत्सव आणि उत्साहाचा जल्लोष. पण या सगळ्या गडबडीत अनेकदा आपल्या केसांची योग्य काळजी घेतली जात नाही. रंगांमध्ये असलेल्या रसायनांचा परिणाम थेट केसांवर होतो. होळीचा आनंद घेतल्यानंतर केस कोरडे, निस्तेज आणि निर्जीव वाटू लागतात.
काही वेळा केसांचा नैसर्गिक पोतही बिघडताना दिसतो. रंगांमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केसांचा मऊपणाही कमी होतो. अशावेळी होळीचा आनंद घेत असताना केसांची विशेष निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास केसांचे सौंदर्य पुन्हा खुलू शकतं.
होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये अनेकदा केमिकल्स मिसळलेले असतात. यामुळे केस पूर्णपणे कोरडे पडतात आणि त्यांची चमक कमी होते. म्हणूनच सण साजरा करण्यापूर्वी आणि सणानंतर योग्य उपाय केल्यास केसांचा मुलायमपणा आणि नैसर्गिक तेज टिकवून ठेवता येतं. केसांना आवश्यक पोषण देणं आणि सौम्य उत्पादनांचा वापर करणं ही यासाठी महत्त्वाची पावले आहेत. केस निरोगी आणि सुंदर राहावेत यासाठी गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी काही उपयुक्त सूचना दिल्या आहेत.
होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काळजी
केसांना तेल लावा
होळी खेळायला जाण्यापूर्वी केसांना लिव्ह-इन ऑइल लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे केसांभोवती एक थर तयार होतो आणि रंगांतील रसायनांचा थेट परिणाम कमी होतो. मॅकॅडॅमिया ऑइलसारखे पोषक तेल वापरल्यास केस अधिक मऊ आणि चमकदार राहतात. हा सोपा उपाय केसांतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
केस नीट बांधा
होळी खेळताना केस मोकळे ठेवू नये. घट्ट वेणी किंवा आंबाडा बांधल्यास केस जास्त गुंतत नाहीत आणि रंग कमी प्रमाणात लागतात. बांधलेले केस अधिक सुरक्षित राहतात आणि नंतर स्वच्छ करणंही सोपं जातं.
स्कार्फ, टोपी किंवा रुमालाचा वापर करा
रंगांपासून अतिरिक्त संरक्षणासाठी केसांवर स्कार्फ, टोपी किंवा रुमाल बांधणं उत्तम ठरतं. यामुळे रंगांचा केसांशी थेट संपर्क कमी होतो आणि नुकसान होण्याची शक्यता घटते.
होळी खेळल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
थंड पाण्याने स्वच्छ धुणं
होळी संपल्यानंतर सर्वप्रथम केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. थंड पाणी वापरल्यास रंग आणि रसायनं सहज निघून जातात आणि केसांवरील ताण कमी होतो.
नैसर्गिक पद्धतीने केस सुकवा
होळीनंतर लगेच हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा इतर उष्ण उपकरणांचा वापर टाळावा. आधीच रसायनांच्या संपर्कात आलेल्या केसांवर उष्णतेचा अतिरिक्त परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या सुकू द्यावेत.
सौम्य शॅम्पूचा वापर करा
केस धुताना माइल्ड शॅम्पू वापरणं आवश्यक आहे. सौम्य शॅम्पूमुळे केसांतील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि केसांचा मऊपणा जपला जातो.
पोषणासाठी हेअर मास्क लावा
रंगांमुळे कमी झालेलं पोषण स्तर भरून काढण्यासाठी हेअर मास्क लावणं उपयुक्त ठरतं. मधासारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले मास्क टाळूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नियमितपणे मास्क लावल्यास केसांची चमक आणि मऊपणा परत येण्यास मदत होते.