ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खोट्या कंत्राटाचे आमिष; मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्यांने केली ६ कोटींची फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था
शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार व्यावसायिक हे विद्याविहार येथील रहिवासी असून त्यांचा लाकडी आणि मेटल फर्निचरचा व्यवसाय आहे. मार्च महिन्यात त्यांचा कामगार सल्लागार नितीन गुप्ताने त्यांची ओळख इतर चार आरोपींशी करून दिली. या आरोपींनी आपली ओळख मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री, आरोग्यमंत्री किंवा आयएएस अधिकारी अशी खोटी माहिती देत तक्रारदाराला गंडा घालण्याचा कट रचला.

दिडशे कोटी रुपयांच्या कंत्राटाचे आमिष दाखवत, त्यामधून १२ कोटींचा नफा मिळू शकतो असा हवाला देत त्यांनी आरोग्यमंत्र्यांना ३० कोटी आणि इतर अधिकाऱ्यांना ६ कोटी रुपये कमिशन देण्याची अट घातली. विश्वास बसल्याने तक्रारदाराने टप्याटप्याने सहा कोटी रुपये आरोपींकडे सुपूर्द केले.

काही दिवसांनी या व्यावसायिकाला कंत्राट मिळाल्याचे भासवणारा एक शासन निर्णय (जीआर) देण्यात आला. मात्र, त्यांनी त्यांच्या कायदेशीर सल्लागाराकडून त्याची खातरजमा केल्यानंतर तो जीआर खोटा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करत आरोपींनी बनावट ओळखी, खोटे दस्तावेज आणि शासनाचा बोगस जीआर वापरून फसवणूक केल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात, तोतयागिरी आणि बोगस कागदपत्रांद्वारे अपहार या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर आर्थिक गुन्ह्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, वांद्रे पोलिसांना सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपींच्या कनेक्शनचा तपास आणि इतर शक्यतो फसवणुकीच्या प्रकरणांचीही चौकशी सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!