मिरजगीचे बाळासाहेब लोंढे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
पुसेगावला राज्यात उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार तर्फे सन २०२३ साठी दिला जाणारा राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणेचा पुरस्कार पुसेगाव पोलीस ठाण्याला मिळाला असून तत्कालीन प्रभारी अधिकारी बाळासाहेब लोंढे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.ठाणे आयुक्तालयात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये राज्यातील इतर पोलीस ठाण्यांचाही अन्य विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम,पंकज भोयर,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला,मुख्य सचिव सुजाता सौनिक,मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदिंसह ठाण्याचे पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बाळासाहेब लोंढे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी गावचे आहेत.निवृत्त मंडल अधिकारी बसवराज लोंढे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांची दोन्ही मुले पोलीस अधिकारी आहेत.लोंढे यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना उल्लेखनीय कार्य केले असून यामध्ये तात्काळ गुन्हे उघडकीस आणणे,गुन्हयाची निर्गती, दोष सिद्धी,प्रशासन आस्थापना,पायाभूत सुविधा,जनसंपर्क,महिला अत्याचाराच्या विरुद्ध गुन्हे,एमपीडीए अंतर्गत कारवाई, मोक्का अंतर्गत कारवाई आदी मुद्यावर प्रभावी आणि लक्षवेधी कामगिरी केली.
सातारा जिल्हयाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढे यांनी ही कामगिरी बजावली.लोंढे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्कलकोट तालुक्यातून देखील कौतुक होत आहे.