मुंबई प्रतिनिधी : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला आहे. सिंगापूरमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हत्येनंतर राजधानी ढाकासह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. इंकलाब मंच या संघटनेने थेट भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप करत, “हा खून त्यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आला,” असा दावा केला आहे. भारतातून शेख हसीना यांना तात्काळ बांगलादेशात आणून शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
इंकलाब मंचाने फेसबुक पोस्टद्वारे शरीफ उस्मान हादी यांना ‘शहीद’ घोषित करत, त्यांच्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत आणण्याची मागणी केली आहे. “वेळीच कारवाई झाली नाही, तर शाहबागमध्ये आंदोलन छेडले जाईल आणि संपूर्ण देश ठप्प केला जाईल,” असा इशारा युनूस सरकारला देण्यात आला आहे. मंचाच्या मते, हा हल्ला एका व्यक्तीवर नव्हे तर बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर झाला असून, हल्लेखोर भारतातून आले आणि हत्या करून पुन्हा भारतात पळून गेले.
दरम्यान, देशभरातील हिंसाचारात काही ठिकाणी अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. आंदोलकांनी वृत्तपत्र कार्यालये, वृत्तवाहिन्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. अनेक शहरांमध्ये वाहतूक ठप्प झाली असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरण आणि त्यानंतर उसळलेला असंतोष बांगलादेशसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.