सोलापूर वृत्तसंस्था
नाशिकनंतर सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जात असून बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सात जणांनी येथील एचडीएफसी बँकेची तब्बल २ कोटींची फसवणूक केली आहे. यामुळे यांच्यावर येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेचे सहउपाध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी मुकुंद हणमंत जाधवर, स्वप्नाली मुकुंद जाधवर, सखुबाई हणमंत जाधवर, विजय शैलेंद्र कराड (सर्व राहणार सोलापूर), राजाराम विठ्ठल खरात, अजित विष्णू दळवी आणि लता विठ्ठल जाधव (सर्व राहणार सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे वरील सात जण संचालक आहेत. त्यांनी, ऍग्रो स्ट्रक्चर फंड योजनेतून एचडीएफसी बँकेकडे कर्जाची मागणी केली होती. तर बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी बँकेकडे जमीन तारण ठेवली होती. यानंतर वेंन्डर कंपनी गौरी कंट्रक्शन, अँड अथर्व मूव्हर्स, यमुना हाइट्स गुरुकृपा सोसायटी कोंढवा पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज मंजूर केले. तसेच १ कोटी ९८ रूपयांचा भरणा खात्यावर केला.
हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करायचे होते. मात्र ज्या जमिनीवर हा प्रकल्प उभा करायचा होता. तो आज अखेर उभारण्यात आलेला नाही. तसेच कर्जाची रकमेची परतफेड देखील करण्यात आलेली नाही. यामुळे बँकेचे सहउपाध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकिची फिर्याद दिली. या फिर्यादी प्रमाणे पोलिसांनी बँकेची १ कोटी ९८ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.