मुंबई : वृत्तसंस्था
बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. दरम्यान या घटनेनंतर काल बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल १० तास रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला.
घटनेनंतर चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. बदलापुरातील त्या प्रतिष्ठित शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. त्या नराधमाला आताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनानंतर अनेक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल दीड हजारहून अधिक लोकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
आता या आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या 22 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व आंदोलक कर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आंदोलनकर्त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज करणार आहेत. कल्याण न्यायालयाने हा निर्णय देताच आंदोलकांच्या नातेवाईकांनी कोर्टाबाहेरच हंबरडा फोडला.