नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर होणे बाकी असतांना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तर अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे डबल इंजिनचे सरकारच जनता निवडून देणार आहे. महाविकास आघाडीत किमान 11 मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. नाना पटोले मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे. मात्र त्यांनी आधी ओबीसी आरक्षण प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी. पटोले यांच्यासह काँग्रेसकडे आठजण इच्छुक आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसाठी काँग्रेसकडे भीक मागत फिरत आहेत. मात्र आपल्या खात्रीलायक सूत्रानुसार शरद पवार यावेळी कोणाचेही ऐकणार नसून सुप्रिया सुळेंनाच ते मुख्यमंत्री करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, महायुतीत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. भविष्यात मुख्यमंत्री कोण होणार हे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिन्ही नेते बसून ठरवतील. केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय राहील. मात्र देशात 2029 पर्यंत मोदी सरकारच राहणार असल्याने डबल इंजिन सरकार हाच अजेंडा घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. कारण चुकूनही महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले तर मोदी सरकारच्या योजना बंद पाडतील.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जनहिताच्या 15 योजना आमच्या काळातील बंद केल्या होत्या. आम्हाला विरोधात बसण्याची चिंता नाही, मात्र राज्यातील 14 कोटी जनतेच्या हिताचे सरकार सत्तेत यावे हीच आमची इच्छा आहे. महाराष्ट्रात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच असल्याने स्वाभाविकपणे भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावे असे आम्हाला वाटते. या शब्दात गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचे बावनकुळे यांनी यावेळी समर्थन केले.