ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे ; शिंदेंचा विरोधकांना स्फोटक इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. ठाण्यातील विविध दिवाळी पहाट कार्यक्रमांना शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते.

“विरोधक दररोज आरोपांचे फटाके फोडतात, परंतु त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळवणार आणि विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत. आमचे लक्ष विकासावर आहे आणि विरोधकांचे काम फक्त आरोप, टीका करणे आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“विरोधकांना आता पराभव दिसू लागला आहे. म्हणूनच ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुती आणि आम्हाला दोष देतात, निवडणुका होऊ शकल्या नाहीत कारण सर्वोच्च न्यायालयात याचिका होती. त्याला आम्ही जबाबदार नाही. पण आता महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणून आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभं आहे. आम्ही दिलेलं वचन पाळलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचतोय. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या गायी वाहून गेल्या, त्या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. कारण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणं ही आमची संस्कृती आहे,” असेही शिंदे म्हणाले.

“संकटात धावून जाणं आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवलं आहे. त्यामुळे आम्ही केवळ बोलत नाही, कृती करून दाखवतो. पूर परिस्थितीत केंद्राने मोठी मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे ती शक्य झाली,” असे शिंदे यांनी नमूद केले. Eknath Shinde |

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!