मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २६ लाख ३४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने उघड केली आहे.
यामुळे आता या सर्व महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (६ ऑगस्ट) अंगणवाडी सेविका प्रत्येक जिल्ह्यातील संशयित लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ५९ लाख अर्ज प्राप्त झाले होते, आणि त्यासाठी निधीही वितरित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या बँक खात्यांमध्ये १,५०० प्रति महिना जमा करण्यात आले. मात्र, निवडणुकीनंतर अर्जांची कसून तपासणी सुरू झाली, ज्यामध्ये अनेक महिला अपात्र ठरल्या.
आता पुन्हा २६ लाख ३४ हजार महिलांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या पात्रतेची पडताळणी करतील.
या पडताळणीत ज्या महिलांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतला आहे, त्यांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे. विशेषत: योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिलाच पात्र आहेत. तरीही, सोलापूर जिल्ह्यात २६,०७८ महिलांनी वयोमर्यादा नसतानाही लाभ घेतला. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे ८३,७२२ प्रकरणे आढळली. धक्कादायक बाब म्हणजे, काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणार असून, त्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत वसूल केली जाईल.