सोलापूर : प्रतिनिधी
येथील भीम प्रतिष्ठानतर्फे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ‘संचार’चे उपसंपादक विक्रम खेलबुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील नऊजणांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 24 वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येत असून यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह येथे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल बारबोले हे राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. उदय वैद्य , उद्योजक पद्मचंद राका, राजेंद्र शहा – कासवा, डॉ. शिवाजीराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक बाबा बाबरे , अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस अमित बाबरे, सिद्धांत बाबरे, ॲड. विशाल मस्के, अकबर शेख आदी उपस्थित होते.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
भीम प्रतिष्ठानतर्फे यावर्षी सामाजिक पुरस्कार जावेद नगारे, शैक्षणिक सेवा पुरस्कार शिवाजी व्हनकडे,शैक्षणिक पुरस्कार श्वेता विकास कस्तुरे, पत्रकारिता पुरस्कार ‘संचार’चे उपसंपादक विक्रम खेलबुडे, क्रीडा पुरस्कार मीनाक्षी रघुनाथ देशपांडे, विशेष गौरव पुरस्कार ॲड. प्रदीपसिंग राजपूत, गौरव पुरस्कार सर्जेराव सावंत, मानपत्र तेजस्वी रामचंद्र वडावराव, रामचंद्र वाघमारे आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.