मुंबई : वृत्तसंस्था
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रविवारी लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. गुजरातचा हा तिसरा विजय होता तर हैदराबादचा या सिझनमधील चौथा पराभव होता. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. तर इशांत शर्मा खूप महागडा ठरला. त्यानंतर आता बीसीसीआयने इशांतवर मोठी कारवाई केली आहे.
इशांत शर्मा सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. यासंदर्भात आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला लेव्हल 1 चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केल्यामुळे, यावर पुढील सुनावणी होणार नाही. शिक्षा म्हणून, त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध इशांत शर्माने खूपच खराब कामगिरी केली. त्याने त्याच्या 4 षटकांत 53 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आयपीएल 2025 मध्ये इशांतची कामगिरीही काही खास राहिली नाही. चालू हंगामात त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत फक्त एकच विकेट घेतली आहे. इशांत शर्मा 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. त्याने 113 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 93 विकेट्स घेतल्या आहेत.