बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बीड जिल्हा सतत चर्चेत राहिला. मारहाणीचे व्हिडीओ, धक्कादायक फोटो व्हायरल झाले आणि “बीड बिहार झाला” अशा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या हत्येप्रकरणात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वातावरणही तापले होते. आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात असून, त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने सखोल सुनावणीनंतर हा अर्ज नामंजूर केला.
न्यायालयाने दिलेल्या निकालात वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात सहभाग, त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या यामध्ये त्याची सक्रिय भूमिका असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईलवरील संभाषणे, कराड व इतर आरोपींमधील सातत्यपूर्ण संपर्क, जप्त केलेल्या व्हिडीओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांची पुष्टी तसेच प्रयोगशाळेतील अहवाल या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने कराडचा जामीन फेटाळल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, पुढील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.