मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच आता शिंदेंच्या सेनेतील मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठ वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील महिन्यात राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. गत काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनेक आमदार व खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली आहे.
संजय शिरसाट यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांना ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात येण्याची चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांत किती सत्यता आहे? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, राजकारणात अशा प्रकारे जे प्रवेश होतात, त्यांची नावे ऐनवेळी जाहीर केली जातात. पण ठाकरे गटाचे सर्व खासदार आमच्या संपर्कात आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी कितीही काहीही बोलले तरी ज्यांना संपर्क करायचा असतो, तो करत असतो. कारण, 5 वर्षे विरोधात राहून काय करणार? त्यांचे उद्याचे भविष्य काय?
उद्या काय घडणार हे देखील माहिती नाही. त्यामुळे सत्तेत राहिले तर मतदारसंघासाठी चांगली कामे होतील. पक्षात त्यांना चांगले स्थानही मिळेल. त्यामुळे सर्वजण आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाचे खासदार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. पण यासंबंधीचा निर्णय केव्हा घ्यायचा हे शिंदेच ठरवतील. हा निर्णय लवकर होईल. फार वेळ वाया जाणार नाही. अशा प्रकारची अवस्था केवळ ठाकरे गटातच नाही, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही आहे. महिन्याभरात राजकारणाला वेगळी कलाटणी नक्कीच मिळेल.