मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय घट होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट जाणवू लागली आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याचा किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरत असून ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबईकरांसाठीही थंडीचे असतील. मुंबईत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. सकाळच्या वेळेत दाट धुक्यामुळे रस्ते आणि महामार्गांवरील दृश्यमानता मोठ्या प्रमाणात घटली असून सकाळी ५ ते ९ या वेळेत वाहनचालकांना विशेष सावधगिरी बाळगावी लागत आहे. अपघातांची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडूनही खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून काही भागांत तापमान १० अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम शेतीवरही होण्याची शक्यता असून काही पिकांना थंडीचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.