मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांचे शाब्दीक हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच ओबीसी आरक्षणातील नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीमुळे या विषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. काल संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली पाटी देखील फोडून फेकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आता पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयातील कार्यालयात ही घटना घडली आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची घाई होती. त्याच वेळेस एक अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील पार्टी काढून फोडून फेकून दिली. त्यानंतर ही महिला फडणवीस यांच्या कार्यालयात देखील घुसली. या महिलेने कार्यालयातील झाडांच्या कुंड्या देखील फोडल्या. यावेळी महिलेने जोरात आरडाओरोड केली. मात्र या मागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्यानंतर ही महिला तेथून पसार झाल्याची माहिती देखील मिळाली आहे.