जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून जरांगे पाटील सरकारविरोधात लढा देत होते आता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी सायंकाळी त्त्यांना पोलीस बंदोबस्तात अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते, त्यातच तीर्थपुरी येथे बसही जाळण्यात आली. अनेक ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आले. त्यानंतर, मनोज जरांगे यांच्यावर विविध कलमान्वये बीडमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप केले. या आरोपानंतर ते उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखल्यानंतर भांबेरी येथे मुक्काम करून ते सकाळी अंतरवाली सराटीला परतले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजही काही ठिकाणी आक्रमक झाला होता. त्यामुळे, सरकारने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेटची सेवा बंद केली होती. बीडसह अनेक ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आले. त्यानंतर, पोलिसांनी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल केला आहे.
जरांगे यांच्यावर कलम ३४१,१४३,१४५,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रास्ता रोको करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे, शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. बीडमध्ये इतर २५ ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, यांनी दिली.