नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. आज पहाटे झारखंडमधील जमशेदपूर येथे 3.43 वाजता मुंबई-हावडा मेलच्या (12810) पाच बोग्या रुळावरून घसरल्या. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
राजखरस्वान आणि बडाबांबोदरम्यान हा अपघात झाला. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. चक्रधरपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडून मदत गाडी आणि सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मालगाडीच्या डब्याला धडकल्यानंतर मुंबई हावडा मेलचे 5 डबे रुळावरून घसरले. 2 प्रवासी कोचमध्ये अडकले. एनडीआरएफने कोच कापून दोघांनाही बाहेर काढले, मात्र दोघांचाही मृत्यू झाला. सोमवारी बिहारच्या समस्तीपूरमध्ये बिहार संपर्क एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. रेल्वेचे इंजिन आणि एक डबा रुळांवर धावू लागला. बाकीचे डबे मागे राहिले. इंजिनानंतर कोचचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.