मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर, म्हणजेच डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये टप्प्याटप्याने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. मात्र, या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नाशिक येथे मंगळवारी पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. त्यांनी सांगितले की, सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याऐवजी टप्प्याटप्याने घेण्यात येणार आहेत. यामध्ये मनपा, जिल्हा परिषद, नगरपरिषद या सर्व निवडणुका अंतर्भूत आहेत.
नाशिक विभागात एकूण ५०.४५ लाख मतदार असून ४८८२ मतदान केंद्रे असतील. यासाठी सुमारे ८७०५ कंट्रोल युनिट्स आणि १७ हजारांहून अधिक ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. या निवडणुकीत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण निश्चित असून ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लॉटरी पद्धत राबवली जाणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले. याआधीच्या निवडणुकांतही हेच तत्त्व लागू करण्यात आले होते. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार नाही. याआधी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत पारदर्शकतेची मागणी केली होती. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या निवडणुका १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे घेण्यात येणार असून, प्रारूप रचना निश्चित झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पुढे राबवली जाईल.