नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. उमेदवार जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवले त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मनापासून आभार मानत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत आहे. त्याचे नुकसान देखील महायुतीला होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला उमेदवारी द्या, मात्र, लवकर उमेदवारी जाहीर करा, असा सल्ला देखील छगन भुजबळ यांनी महायुतीला दिला आहे. हा संभ्रम लवकर दूर व्हायला पाहिजे, त्यामुळेच मी आज उमेदवार बाबतीत माघार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले.
महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा झाली होती. त्यावेळी आमच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी केली. येथून आमचे माजी खासदार समीर भुजबळ लढतील असे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, तेथून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी अशीच शहा यांचा आग्रह होता. त्यानंतर आम्ही नाशिक मधून चाचपणी केली असता सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.