मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून नुकतेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीवर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग मुसळधार पावसात कोसळल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेसह अनेक पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर त्यांनी टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्टमधून केलेल्या टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्रीने ही राज्यातील राजकारणात प्रियांका गांधी यांची इंट्री मानली जात आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या घटनेव्यतिरिक्त, प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थापनाच्या इतर चिंताजनक घटनांकडेही लक्ष वेधले आहे. या संदर्भात त्या म्हणाल्या की, मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित नसूनही 500 हून अधिक खड्डे पडले आहेत. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर लगेचच कोसळल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला.
या संदर्भात प्रियांका यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्रातील रत्नागिरी स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्ग, जो अद्याप पूर्णत: तयारही झाला नव्हता, त्यात 500 हून अधिक खड्डे पडले आहेत. यापूर्वी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. महाराष्ट्रात ‘फसवणूक आणि फसव्या’ सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशोब करणार आहे.’