मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना-भाजप आघाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकांवर आयएएस सनदी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. आतापर्यंत या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी म्हणजेच स्थानिक पातळीवरील अधिकारी नेमले जात होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महापालिकांवर आयएएस अधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नगरविकास विभागाच्या कारभारात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप वाढला असून शिंदे गटामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 19 ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत. या महापालिकांची लोकसंख्या मिळून साडेचार लाखांपेक्षा अधिक असून जवळपास 900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प या महापालिकांमधून हाताळला जातो. याआधी अ, ब आणि क वर्गातील महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याची पद्धत होती. परंतु ड वर्गात हा नियम लागू नव्हता. आता त्याचाही समावेश करण्यात आल्याने स्थानिक सत्ताधारी गटांचा प्रभाव कमी होणार असल्याची भीती शिंदे गटातील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाशी संबंधित काही अधिकारी अलीकडेच ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे नाट्य केवळ सरकारपुरते मर्यादित नसून त्यांच्या शिवसेनेतही उघडपणे दिसू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने विभागप्रमुखांची नेमणूक केली. मात्र या नियुक्त्यांवरून पक्षात मोठे नाराजीचे वादळ उठले आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्याने तणाव निर्माण झाला. तर आता दक्षिण मुंबईतही ही नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः शिवडी विधानसभा क्षेत्रातील विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोले यांची नियुक्ती झाल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. पाच शाखांपैकी चार शाखाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.