ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : महाविकास आघाडीत पडली फुट : कॉंग्रेसची स्वबळावर !

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, अशी अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली. परिणामी, महाविकास आघाडी मुंबईत फुटली असून, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे हे तिघेच आघाडीत उरले आहेत. याचा अर्थ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत मुंबईत पाहायला मिळेल.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंच्या नादी न लागता स्वबळावर मुंबई महापालिका लढवा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे आणि मुंबई काँग्रेसचेही नेते करत होते. त्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर्वांत आघाडीवर होते. त्यातूनच मुंबई काँग्रेसच्यावतीने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला होता. त्याला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला असल्याचे चेन्नीथला यांनी जाहीर केले.

हुकुमशाही असलेल्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नाही. मुंबई ही सगळ्यांची आहे. परप्रांतियाना मारहाण करणे हे काँग्रेसला मान्य नाही. सगळयांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख परप्रांतीयांना मारझोड करणाऱ्या मनसेकडे होता.

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची नेते आणि कार्यकर्ते यांची मागणी होती. त्याप्रमाणे निर्णय झाला आहे. काँग्रेसचा मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा महापौर बसेल, असा निर्धार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळेल, असे मत आमदार अस्लम शेख यांनी मांडले.

मुंबई शहरात गेल्या काही वर्षात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यात आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचे मुंबईतील उरले सुरलेले अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या स्वबळामुळे महाविकास आघाडीलाही धोका निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 30 ते 40 दरम्यान राहिले आहे. या आधीच्या म्हणजे 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नसताना धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होईल. त्यातून आपल्या किती जागा काँग्रेस राखते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!