मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मंत्री मानले जाणारे मंत्री जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत सापडले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत, रोहित पवार आणि एका youtube चॅनेल विरोधात हक्क भंग दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यासह रोहित पवारांवर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केले आहे. ते एक विकृत मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आली आहे. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला आहे. या महिलेने या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच हल्लकल्लोळ माजला आहे.
पीडित महिलेने यासंबंधी राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात पीडितेने हे संपूर्ण प्रकरण विषद केले आहे. त्यानुसार, सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती.