बदलापूर : वृत्तसंस्था
बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांच्या लोभात फसवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर बदलापूर पोलीस ठाणे यांनी रॅकेटमध्ये सहभागी तीन महिलांना ताब्यात घेतले असून, आणखी किती महिलांना याचा बळी पडला आहे, याचा तपास सुरू आहे.
बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर या गंभीर घटनेची माहिती समोर आली. नंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करून रॅकेटच्या तिघा सदस्यांची माहिती मिळवली. ज्युवेली गावातील सुलक्षणा गाडेकर, उल्हासनगर येथील अश्विनी चाबूकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ज्युवेली गावातील नॅनो सिटी येथे राहणारी सुलक्षणा गाडेकर ही महिलांना पैशांचा लोभ दाखवून गर्भाशयात स्त्री बीज वाढीसाठी लागणारी इंजेक्शन्स घरातच देत होती. याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करून गर्भाशयाची माहिती घेऊन महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात होते. ऑपरेशन थिएटरमध्ये अंडाशय काढून त्याची सर्रासपणे विक्री केली जात होती.
गाडेकरच्या घरातून पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रे, महिलांचे फोटो व इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणामुळे बदलापूरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पोलिसांकडून रॅकेटशी संलग्न इतर लोकांचा शोध सुरू आहे. लोकांमध्ये घबराट असून प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.