मुंबई : वृत्तसंस्था
देशातील नागरिकांना नेहमीच महागाईचा सामना करावा लागत आहे पण सध्या सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी पडझड दिसून आली. जागतिक बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत नशीब आजमावले. सोने-चांदीच्या किंमती पार गगनाला भिडल्या. सोन्याने 67,000 रुपये प्रति तोळ्याचा प्रवास सुरु केला तर चांदी पण ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली. जळगावच्या सुवर्णनगरीपासून ते लातूरच्या सराफा बाजारापर्यंत वाढलेल्या भावांनी वधू पित्याचे टेन्शन वाढवले. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शहरी भागात तर सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनमच्या दागिन्यांची क्रेझ वाढली आहे. या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत इतकी घसरण झाली.
सराफा बाजारात सोने 65 हजारांच्या पुढे गेले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) यावर्षी 4 मे 2023 रोजी सोने सर्वात महाग होते. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि पुढे सोन्याने नवनवीन रेकॉर्ड केले. . 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. पण प्रत्यक्षात अनेक सराफा बाजारात सोने 66,000 रुपयांच्या घरात पोहचले होते. काही शहरात तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत चांदीत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,200 रुपये आहे.