ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जिल्हा बँकांतूनही मोफत ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया लवकरच

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. तातडीच्या कर्जासाठी आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांपुरती मर्यादित असलेली ऑनलाईन सुविधा लवकरच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही लागू होणार आहे. नाबार्डने यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून ‘ई-किसान पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.

सरकारने शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ऑनलाईन कर्ज मागणीची सोय सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारांना मिळत असून, आता जिल्हा बँकांनाही मोफत ऑनलाईन कर्ज प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या नव्या प्रणालीचा थेट फायदा होणार आहे.

जिल्हा बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्ज वितरण करतात. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाईन पोर्टलचा वापर मर्यादित होता. मात्र ‘ई-किसान पोर्टल’ कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा बँकांनाही ऑनलाईन पद्धतीने पीक कर्ज मंजुरी व वितरण करता येणार आहे. यामुळे कर्जाचा संपूर्ण हिशोब शेतकऱ्यांना ऑनलाईन पाहता येईल आणि कर्ज मिळण्यास होणारा विलंब कमी होईल.

या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जनसमर्थ आणि ई-किसान पोर्टलच्या माध्यमातून अतिरिक्त अर्जफाट्याशिवाय, कमी कालावधीत पीक कर्ज मिळणार आहे. यासाठी लवकरच तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांची समिती गठीत करून पुढील कार्यवाही राबवली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. मोफत, पारदर्शक आणि वेगवान ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!