ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का : नेत्याने घेतला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश !

मुंबई  ; वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेल्या दत्ता दळवी यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दळवी हे मुंबईचे माजी महापौर आहेत. त्यांचा स्थानिक शिवसेनेवर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामु्ळे त्यांचा प्रवेश ठाकरेंसाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे उलटफेर होत आहेत. मराठी व महाराष्ट्राच्या मुद्यावर सध्या राज व उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होण्याचे म्हणजे ते एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने दत्ता दळवी यांना आपल्या गळाला लावले आहे. दळवी यांनी सोमवारी रात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण पक्षातील पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर काही तासांतच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

दत्ता दळवी हे टाकरे गटात शिवसेनेचे उपनेते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ते सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून मुंबई मनपात निवडून गेले. त्यांनी 2005 ते 2007 या काळात मुंबईचे महापौरपदही भूषवले. ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी दळवींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यामुळे त्यांना अटकही झाली होती. पण आता ते स्वतःच शिंदे गटात गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे, गत काही महिन्यांत ठाकरे गटाचे मुंबईतील जवळपास 45 ते 50 माजी नगरसेवक शिंदे गटात गेलेत. या सर्वांच्या जोरावर एकनाथ शिंदे यांचा मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा विश्वास वाढला आहे. दत्ता दळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. काही जण मुंबई महापालिकेला त्यांची जहागीर समजतात. या लोकांनी मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केली, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!