सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटनासह चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणार्या सराईत आरोपीकडून 14.77 तोळे सोने व 89.53 तोळे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 48 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. राजकुमार पंडित विभुते (वय 43, रा. बोरामणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाला रेकॉर्डवरील संशयित आरोपी विभुते मुळेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. अटक करून घरफोडीतील चोरीस गेलेले 14.77 तोळे सोन्याचे व 89.53 तोळे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 48 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.