ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सालियन प्रकरणी मोठी अपडेट : तीन जणांनी पाहिले : तेव्हा अंगावर कपडे होते !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दिशा सालियन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी पाहिले होते. या तिन्ही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी दिशाच्या अंगावर कपडे असल्याचा जबाब नोंदवला आहे. यामुळे दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी दिशावर अत्याचार झाल्यासंबंधी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, दिशा सालियन 14 व्या मजल्यावरून इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर असलेल्या फुटपाथजवळ पडली. तिच्या बिल्डींगबाहेर जवळपास 20 फूट लांब पार्क केलेल्या एका गाडीच्या अगदी समोर ती पडली. त्यावेळी त्या गाडीमध्ये दोन-तीन तरुण बसले होते. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकताच ते हादरले. त्यांनी गाडीबाहेर येऊन पाहिले असता त्यांना दिशा जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले.

मालवणी पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये या तरुणांचा व घटना घडली त्या इमारतीच्या वॉचमनचाही जबाब नोंदवला आहे. त्यानुसार, दिशा 14 व्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते. ती खाली पडल्यानंतर इमारतीच्या वॉचमनसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांनी आपल्या खिडकीतून घटना पाहिली. त्यानंतर ते ही खाली उतरले. त्यांनी दिशाला खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात नेले. तिला प्रथम एव्हरशाईन नर्सिंग होम व नंतर तुंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण या दोन्ही रुग्णालयांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला.

अखेर तिला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी आपल्या तपासात एव्हरशाईन नर्सिंग होम, तुंगा हॉस्पिटल व शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवलेत. विशेष म्हणजे दिशा ज्या गाडीच्या समोर पडली होती, त्या गाडीतील तरुणांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती, असेही मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी त्यांनी जवळपास 100 ते 150 जबाब नोंदवलेत. त्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी आपला क्लोजर रिपोर्ट एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा रिपोर्ट मंजूर झाला आहे. पण या प्रकरणी एसआयटी स्थापन होऊन नव्याने तपास सुरू झाल्यामुळे तो प्रलंबित पडला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!