ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२०२४ च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय हवा ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजस्थानसह तीन राज्यांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विक्रम मोडून काढेल, असा विजय २०२४ च्या निवडणुकीत मिळवण्याचे ‘लक्ष्य’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच भारतीय जनता पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोहीम हाती घेतली आहे. भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी दोन दिवसांची बैठक बोलावली होती. शुक्रवारपासून सुरू झालेल्या बैठकीचा शनिवार दुसरा दिवस होता. गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मोठे नेते भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले होते.

महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मोठे लक्ष्य दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, २०२४ च्या निवडणुकीमध्ये ३०३ जागांचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड रचला गेला पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले आहे भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या अधिकाऱ्यांना मिशन मोडमध्ये काम करण्यास सांगितले. याशिवाय केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही बैठकीत सांगण्यात आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचीही बैठक होती. याआधी शुक्रवारी बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर प्रमुख नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रूपरेषा ठरवली जाणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी संघटनेच्या नेत्यांच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा होऊ शकते याशिवाय विकसित भारत संकल्प यात्रेबाबतही चर्चा होणार आहे. यात सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राष्ट्रीय अधिकारी आणि देशभरातील सर्व मोर्चाचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की, महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब या चार जाती लक्षात ठेवून काम करायचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण माझ्यासाठी फक्त चार जाती महत्त्वाच्या आहेत आणि त्यात महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी यांनी मिशन मोडमध्ये काम करणे आणि केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची जास्तीत जास्त माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप बूथ स्तरावर १० टक्के मते वाढवण्याच्या उद्देशाने काम करत आहे. यासाठी बूथ व्यवस्थापन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!