मारुती बावडे
औसा: श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा ६४ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा श्री नाथ सभागृह औसा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या हजारो अनुयायांनी फोनवरून सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष भेटून अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.
ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अध्यात्मिक सेवेत केलेली तपश्चर्या ही सर्वांना बळ देणारी असून त्यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या प्रवचन सेवेतून चांगली पिढी घडत आहे.त्यांचे कार्य अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावे,अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. त्यानिमित्त श्री नाथ संस्थान औसाचे पाचवे पिठाधीपती सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी औसेकर महाराजांनी सर्व अनुयायी आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करत असेच प्रेम आणि सहकार्य कायम असावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार,चाकूरचे नगराध्यक्ष कपील माकणे, मच्छींद्रनाथ महाराज, श्री रविशंकर महाराज, गोविंदराव माकणे, गिरीश पाटील,माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, ह.भ.प श्री श्रीरंग महाराज, ॲड. ज्ञानराज महाराज, ओम मोतीपवळे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, श्री अनिरुद्ध महाराज, श्री पुरूषोत्तम जोशीगुरूजी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अक्कलकोट येथील सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त धनराज भुजबळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह औसेकर महाराजांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.