पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना नुकतेच आता पुण्यात चक्क बिर्याणी चोर दिसले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला. बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले. भूक भागवण्यासाठी त्यांनी हॉटेल फोडल्याचंही समोर आलं.
पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एक हॉटेल आहे जिथे बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. दोन ते तीन चोरट्यांनी पहाटेच्या वेळी या हॉटेलचे शटर तोडले आणि आत प्रवेश केला. बिर्याणी खाण्यासाठी चोरट्यांनी थेट हॉटेलच्या किचन मध्ये प्रवेश केला. आणि कुठे बिर्याणी मळते का हे पाहत त्यांनी प्रत्येक भांड्यात शोधाशोध सुरू केली. हॉटेलमधल्या सगळ्या भांड्यांची उचकापाचक केली. भुकेने कळवळलेल्या या चोरट्यांनी, तिघांनी तोंडाला मास्क लावून संपूर्ण किचन शब्दशः उचकले पण त्यांना एकाही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पण कुठेच बिर्याणी न मिळाल्यामुळे चोरट्यांनी हॉटेल मधील चिकन लॉलीपॉप चोरलं आणि यावर ताव मारला. एवढंच नव्हे तर त्यांनी हॉटेलमधील तीस रुपयाची चिल्लर चोरली व कोल्ड्रिंक्स पिऊन पळ काढला.