मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून मुंबई, नाशिक, नागपुर, सोलापुर, पुणे, बीड, परळी, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले आहेत.
नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून बीड, औरंगाबाद, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईत भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुलुंड चेक नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान बोलताना आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. हे राजकीय आरक्षण परत मिळवणं ही भाजपाची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ”, असं आशिष शेलार म्हणाले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पुण्यात मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. परळी शहरातील इटके कॉर्नर चौका मध्ये हे चक्काजाम आंदोलन सुरु आहे, या आंदोलनानंतर सरकारचे डोळे उघडले नाही तर आम्हाला पुन्हा सरकारचे डोळे उघडण्यासाठी वारंवार आंदोलनं करावी लागतील असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाले.