ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप मुद्यावरून आता गुद्यावर आले ; पाटलांनी लगावला टोला

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आतापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला असून, विधानसभेतही पराभव स्पष्टपणे दिसून येत असल्याने भाजपची भाषा बदलली आहे. या नैराश्येतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठोका, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपची विद्वत्ता संपली असून, शब्दही संपलेत. त्यामुळे भाजप मुद्यावरून आता गुद्यावर आल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटं नरेटिव्ह पसरवले, असा आरोप आता केला जात आहे. पण आपलेच ११ उमेदवार भाषणात संविधान बदलण्यासाठी दिल्लीत पाठवा, असा प्रचार करत होते. लोकसभेत ३७ ते ३८ जागा निवडून येणे अपेक्षित होते. पण काही मतदारसंघांत पैशांचा पूर आला. काही ठिकाणी ‘पिपाणी’ने घात केला.

विधानसभेचे वारे वाहू लागल्याने विराेधक घाबरले आहेत. मतांसाठी सध्या मोठमोठ्या घोषणांची खैरात वाटप केली जात आहे. पण महायुतीला आपल्या तिजोरीत किती पैसे आहे हे कळत नाही. लाडकी बहीण योजना आणली. पण राज्यात ४२ हजार महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, असे पाटील म्हणाले. तसेच लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त ताकदीने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड काळात खटाव तालुक्यातील माैजे मयाणी येथे एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला. त्यात भाजपच्या एका आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ससूनची अवस्था दयनीय असून, तेथे विविध घटना घडल्या असतानाही शासन त्याची दखल घेत नसल्याने ससूनचा दर्जा घसरल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असेल. २०१९ मध्ये २३ नोव्हेंबरला अजित पवार व फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे फार तर १५ ते २० दिवस मागे पुढे होऊ शकतात. निवडणूक आयोगावर कुणाचा दबाव नसल्यास ऑक्टोबरमध्ये निवडणूक लागेल, असा दावा पाटील यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!