सोलापुर : प्रतिनिधी
सोलापुरातील एका कार्यक्रमात अपक्ष खा.विशाल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. आमच्या घरात भाजपने फुट पाडली. फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करून घेतला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की विशाल पाटलांना आम्ही घेणार आहोत. अहो.. मी अपक्ष निवडून आलो. भाजपच्या दिन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो, असेही विशाल पाटील यांनी यावेळी म्हटले. सोलापूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विशाल पाटील सोलपुरात बोलताना म्हणाले, मी अपक्ष निवडून आलो, मी जरी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे. काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही व्हायचे आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागले, अडचणीत यायला लागले तरी दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. थांबण्याची आमची क्षमता आहे. चूक केली असेल तर धाडसाने सामोरे जाण्याची गरज होती. कार्यकर्त्यांना स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विचार मजबूत आहे. मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते सामान्याला नेता बनवू शकतात.
पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्र कसा लुटायचा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र महाराष्ट्राला लाचार करण्याचे काम दिल्लीवाल्यांनी केले आहे. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, एवढी ताकद महाराष्ट्रात आहे. शक्तिपीठ महामार्गात जास्तीत जास्त कसा पैसा खाता येईल, एवढाच उपयोग चालला आहे. तुमच्या थोडे खिशात टाकायचे आणि इथून भरभरून घ्यायचे आणि देशभरावर महाराष्ट्राच्या जिवावर राज्य करायचे. हा भाजपचा डाव आहे, असेही विशाल पाटील यांनी म्हटले आहे.