भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी; काम तर काहीच नाही
काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा खोचक टोला; अक्कलकोटमध्ये प्रचंड प्रतिसाद
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आकाशात विमान घिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली. भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.
शनिवारी, आमदार प्रणिती शिंदे अक्कलकोट तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न, दुधाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले. प्रणिती यांनी सांगवी, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळ्ळी, बोरगाव, घोळसगाव, साफळा, कडबगाव, नाविदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या.वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे.
यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले.याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले यावेळी अक्कलकोट तालुक्यातून प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल आणि त्या शंभर टक्के विजयी होतील.भाजपने आजवर जे जे केले ते केवळ जातिवाद करून समाजा समाजामध्ये भांडणे लावली आणि भावनेचे राजकारण करून समाजाचे वाटोळे केले, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा शितल म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शहर अध्यक्ष रईस टीनवाला, शिवसेनेचे आनंद बुक्काणूरे, राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू, संचालक इरण्णा धसाडे, सिद्धार्थ गायकवाड, सायबु गायकवाड, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला, माजी सरपंच रवि वरनाळे, उद्योजक राजकुमार निरोळी, बाजीराव खरात,सिद्धु कोळी, रवी पोमाजी, धानपा आळंद, शकील शेख, अरुण जाधव, अशोक बंदीचोडे, काशिनाथ कुंभार, सुनिल कोळी, संतोष मडिवाळ आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.