ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई वृत्तसंस्था 

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आणि पीयूष गोयल यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

महिलांसाठी २१०० रुपयांची भेट

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने त्यांच्या संकल्पपत्रात “लाडक्या बहिणींना २१०० रुपये” देण्याची घोषणा केली आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्यासह समाजात त्यांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपने महिला सबलीकरणासाठी विशेष योजना राबविण्याचा संकल्प केला आहे.

 

शेतमालाची हमीभावाने खरेदी व भावांतर योजना

शेतकऱ्यांसाठी हमीभावाने माल खरेदी करण्याची आणि भावांतर योजना राबवण्याची घोषणा भाजपने केली आहे. शेतमालाच्या दरात तफावत असल्यास शेतकऱ्यांना तफावत सरकारकडून भरून दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. भाजपच्या या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

 

वयोमानानुसार योजना आणि वाढीव पेन्शन

ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून, आता १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहेत. यासह १२० वर्षांचे दीर्घायुषी नागरिक असलेल्या महाराष्ट्रासाठी विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक सुरक्षा वृद्धिंगत करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतो.

 

रोजगार निर्मिती व FDI वाढविण्याचे उद्दिष्ट

महाराष्ट्रात २५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतल्यामुळे १० लाख विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करून राज्यातील वीज बिलांवर ३०% सवलत देण्यात येणार आहे.

 

‘मेक इन महाराष्ट्र’ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक

मेक इन महाराष्ट्र, फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे वचन भाजपने दिले आहे. विज्ञानात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी विशेष व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!