मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, राजकिय क्षेत्रात अशा भेटीगाठी होत असतात. शरद पवार हे राज्यातील नव्हे, देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्यकडुन अनेक जण सल्ला घेतात. या सर्व भेटीकडे राजकिय नजरेने पाहणं गरजेचे नाही. सद्याच्या परिस्थितीनुसार भाजप पुढील शंभर वर्षे सत्तेत येणार नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राज्यात होणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी भाजपला लगावला. त्यामुळे या भेटीकडे मी जास्त गांभीर्याने बघत नाही आणि अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही असे संजय राऊत म्हणाले.
प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, पाच दिवसापूर्वी मीसुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अशा भेटीगाठी होत असतात प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही असे ते म्हणाले.