नवी मुंबई : वृत्तसंस्था
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर मध्यरात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अचानक अस्वस्थता जाणवल्यानंतर मंदा म्हात्रे यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून सर्व वैद्यकीय अहवाल समाधानकारक आहेत. डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंची विचारपूस
मंदा म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली. “घाबरण्याचे काही कारण नाही, जनतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी त्यांना दिलासा दिला आणि त्या लवकरच पुन्हा जनसेवेत सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला.
रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी
मंदा म्हात्रे रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच नवी मुंबईतील त्यांच्या समर्थकांनी अपोलो रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी विविध ठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत.
दरम्यान, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तसेच त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने सध्या भेटीगाठींवर निर्बंध घातले आहेत. नवी मुंबईच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मंदा म्हात्रे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.