मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी केलेली कामे, मिळालेले विजय आदी गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या आधी तपासल्या जात आहेत. त्याद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाजपकडून भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली नाही, तर तिकिट कापले जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मुंबईतल्या बैठकीतही काही आमदारांना कामगिरी सुधारण्याची सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दौरे, बैठका घेतल्या जात आहेत. कोकण, मुंबईनंतर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागनिहाय बैठका घेत आहेत. मराठवाडा, कोकण विभागातील आमदारांची बैठक पार पडली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल, किती गमावणार याची चाचपणी सुरू आहे. आपल्या विभागामध्ये कुठे नक्की फायदा होणार आणि कुठे तोटा होणार यावर चर्चा सुरू आहे. येत्या 2 महिन्यात कुठले विकास काम केले तर भाजपला फायदा होईल हे सुचवा असे आवाहन देखील या बैठकीच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती आहे. विकास काम करा, निधी कमी पडणार नाही, असे निरोप आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा, आपल्या भागामध्ये संघटना मजबूत करा, मित्रपक्षांची नाराजी असल्यास दूर करा, स्थानिक पक्ष संघटना यांच्याशी जवळीक साधा. मराठा आरक्षण हे विरोधकांचे पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा. मराठा संघटनांचा विरोधाला सामोरे कसे जायचे यावर चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.