नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रातील सत्तारूढ भाजपने देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. रोजगाराच्या मुद्यावरून आमच्याशी खोटे का बोललात ? असा सवाल आता देशभरातील तरुण पंतप्रधानांना विचारत असल्याची टीका त्यांनी केली. ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळताच आम्ही ३० लाख शासकीय नोकर भरती करणार असल्याची ग्वाही राहुल गांधींनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीत युवकांना दिलेले रोजगाराचे वचन ‘युवा न्याय’च्या माध्यमातून पूर्ण करीत देशात रोजगार क्रांती घडवण्याचा संकल्प काँग्रेसने केल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की, नरेंद्र मोदीजी, तुमच्याकडे रोजगाराची काही योजना होती का? हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे. देशात दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन तुम्ही का दिले? असा सवाल गल्लीबोळात भाजपच्या लोकांना विचारला जात आहे, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळताच आम्ही ३० लाख शासकीय नोकरभरती करणार आहोत.
प्रत्येक सुशिक्षित तरुणाला वार्षिक १ लाख रुपयांची खात्रीची नोकरी देण्यात येईल. ‘पक्की नोकरी’ देण्यासाठी योजना राबवण्यात येईल. तसेच पेपर लिकला मूठमाती देण्यासाठी कायदा केला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी हिंदी भाषेत केलेल्या ट्विटमधून दिले. काँग्रेसला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे. पण, भाजपला युवकांची दिशाभूल करायची आहे. या दोन्ही विचारसरणीच्या धोरणातील फरक ओळखण्याची हीच खरी वेळ आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. भाजपने निर्माण केलेले भ्रमाचे जाळे तोडून तरुणांना स्वतःचे भविष्य स्वतःच घडवावे लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बेरोजगारीला मुख्य मुद्दा बनवण्याचा काँग्रेसचा इरादा दिसून येत आहे.