जालना : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. मात्र जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली आणि नाकातून रक्तस्राव झाल्याने सलाईन लावण्यात आली होती.. मात्र जरांगेंनी सलाईन काढून टाकली. ते उपोषणावर ठाम आहेत. तसेच अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबईत जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, दिवसभरात हजारो मराठा बांधवांनी आंतरवालीकडे धाव घेत जरांगे पाटलांना उपचार घेण्याची विनंती केली.
जरांगे पाटलांनी मात्र अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार, पाणी आणि सलाइन घेणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याने राज्य सरकारवर दबाव वाढताच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच अंमलबजावणी न झाल्यास त्यांनी पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, ”सरकारने येथे येऊन मला सलाइन लावावे आणि कायद्याची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी त्यांच्या डॉक्टरांचे पथक घेऊन यावे, कायद्याची अंमलबजावणी करावी, मग माझ्यावर उपचार करावे. आपल्या लोकांनी मला सलाइन लावण्याऐवजी सरकारला धारेवर धरावे. मला सलाइन लावायला कोण-कोण होते मला माहीत नाही, त्यांनी झोपेत मला सलाइन लावले. मी ते काढून टाकले आहे. मला जातीपेक्षा कुणीही मोठे नाही”,असे जरांगे म्हणाले.