सोलापूर. दि.१३ – महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी रा ना. पवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चिरंजीव प्रख्यात कवी माधव पवार आणि चित्रकार मुकुंद पवार यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाला विश्वकोशाचे खंड आणि दोनशे ग्रंथ भेट दिले आहेत.
यावेळी माधव पवार, वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर, कार्यवाह दत्ता गायकवाड यांनी रा.ना. पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थितीतही माझे वडील ग्रंथ खरेदी करून वाचत असत त्यांनी आमच्यावर वाङमयीन संस्कार केल्यामुळेच मी कवी म्हणून घडलो असल्याचे कवी पवार यांनी यावेळी सांगितले.
डॉ येळेगावकर म्हणाले की १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात रा.ना. पवार यांनी भाग घेतला होता. देशभक्त भाई छन्नूसिंह चंदेले यांनी सांगूनही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन घेतली नाही, देशाचे स्वातंत्र्य हीच माझी खरी पेन्शन आहे. असे रा.ना. म्हणायचे. त्यांनी लिहिलेल्या कविराय राम जोशी या नाटकाचे त्याकाळी महाराष्ट्रभर २५० पेक्षा जास्त प्रयोग झालेले होते.त्यावेळी या नाटकात जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, हंसा वाडकर, वसंत शिंदे, लिला गांधी यांच्या सारख्या नामवंत कलावंतानी भूमिका केल्या होत्या. रा.ना पवार हे भावगीतकार, भक्तिगीतकार, ताठ कण्याचे, आणि ताठ बाण्याचे कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, समर्थ सहकारी बँकेचे संचालक श्रीनिवास कुमठेकर,प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, ग्रंथपाल दत्ता मोरे यांच्यासह कर्मचारी आणि अभ्यासिका मधील विद्यार्थी उपस्थित होते.