मुंबई वृत्तसंस्था : लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 14 व 15 जानेवारी रोजी दोन महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असल्याने या हप्त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाने या निधी वितरणाला आक्षेप घेत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले असून, या हप्त्याला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारी रोजी हा हप्ता वितरित करण्याचे नियोजन होते. मात्र, 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होत असल्याने सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत लोकानुनय करणारे निर्णय घेता येणार नाहीत, असा आक्षेप काँग्रेसने नोंदवला आहे. महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठीच सरकारने संक्रांतीचं निमित्त पुढे केल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. महापालिका निवडणूक पार पडल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर लाडक्या बहिणींचा द्वेष करत असल्याचा आरोप केला आहे. या योजनेविषयी काँग्रेसचा राग वारंवार उफाळून येत असल्याचे सांगत, महायुती सरकारने योजना जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर उच्च न्यायालयात गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या पर्वावर लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे 3,000 रुपये जमा करत असताना, ते थांबवण्यासाठीच काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. काँग्रेसचा खरा चेहरा यामुळे समोर आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होत असताना, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हा हप्ता वेळेत जमा होणार की निवडणुकीनंतरच मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.