मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे. असं असतानाच आज 12 जून मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची माहित मिळत आहे.
मुंबईतील हॉटेल ताज लँड एन्डमध्ये ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला घोषणेपूर्वीच सुरुंग लागणार का? असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र मोक्याच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला सुरुंग लावण्याची शक्यता आहे. आज सकाळी राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करुन याठिकाणी का पोहोचले, असा सवाल आता विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.