सोलापूर प्रतिनिधी : सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर सोलापूर हादरून गेले असून, सरवदे यांच्या पार्थिवावर काल शोकाकुल वातावरणात आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. आधारवड गमावल्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. “माझे पप्पा मला आणून द्या, मला माझ्या पप्पांना भेटायचं आहे,” असा टाहो सरवदे यांच्या चिमुकल्यांनी फोडला. पत्नी व कुटुंबीयांनीही अमित ठाकरे यांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “राजकारण काहीही असो, कोणीही बिनविरोध निवडून येवो; पण राजकारणासाठी कोणाचाही जीव जाता कामा नये. या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.” या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, येथील उमेदवार रेखा सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यातूनच हा वाद निर्माण झाला. “आमचे याआधी कोणतेही भांडण नव्हते. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सगळे घडले आहे,” असा आरोप करत सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या घटनेवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही मूक आंदोलन केले. सरवदे कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. भाजपची सत्तेची भूक इतकी वाढली आहे की जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. भाजपचा खरा चेहरा आज सर्वांसमोर आला आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे सोलापुरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होते की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.