पुणे : वृत्तसंस्था
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी रांग लागली असतांना नुकतेच पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. या स्टेटसनंतर रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्यामुळे चर्चेला हवा मिळाली होती. या सर्व घटनांवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रील टाकण्याचे माझ्या मनात होते. शिवजयंतीचे वातावरण होते आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या. असे धंगेकर म्हणाले. पण जाताना मी लपून जाणार नाही, असे सूचक विधानही रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईतील शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी रवींद्र धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते. शिवाय त्यांनी स्टेटला भगवे उपरणे परिधान केलेला फोटो देखील पोस्ट केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रविंद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. यानंतर आता या भेटीबद्दल आणि आपल्या स्टेटसबद्दल रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले रविंद्र धंगेकर? हा रील टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला. मी आजारी होतो त्यामुळे तब्येत कमी झाली होती. त्या दिवशीचे अनेक फोटो आहेत. माझे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटते. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. मी काँग्रेसमध्ये काम केले आहे. काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे, असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी रविंद्र धंगेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्याबद्दल बोलताना धंगेकर म्हणाले की, त्यांना वाटते असेल की, आपला मित्र जवळ असला पाहिजे. कोणालाही तसे वाटते. माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे ऑफर देणे काही चुकीचे नाही. माझे सोशल मीडिया कार्यकर्ते मॅनेज करतात. मी काँग्रेसमध्ये चांगल काम केले आहे. हा चांगला पक्ष आहे. गेल्या 2-3 महिन्यांत मी आमदार नसल्यामुळे मला जास्त कुणी भेटायला येत नाही. कार्यकर्त्यांसोबत मला बोलावेच लागणार आहे. भगवे टाकले काही हरकत नाही, मात्र माणुसकी आपला धर्म आहे. दुश्मनालाही आपण मदत करतो. मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. पण जाताना मी लपून जाणार नाही. माझे मत सांगितले रस्त्यावर लढू. कार्यकर्त्यांसोबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बोलणार आहे. यंत्रणेला टक्कर द्यायची तर मैत्री वाढवावीच लागणार आहे. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात, असेही त्यांनी म्हटले.