मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नाही. देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत, राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे. पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार आहेत, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, मी एवढे रडके सरकार केव्हाच पाहिले नाही. आतापर्यंत मला देवेंद्र फडणवीस फारच हुशार राजकारणी व चाणक्य असल्याचे वाटत होते. पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मी त्यांना अजून आपला विरोधक किंवा शत्रू मानले नाही. पण त्यांनी आम्हाला आरक्षण दिले पाहिजे.
मनोज जरांगे यांनी यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. या प्रकरणी त्यांनी पुन्हा फडणवीस यांचे नाव घेतले. ते म्हणाले, आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत. तर काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. समाज हुशार आहे. तो सर्वकाही पाहत आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली आहे. त्यांचे दिवस जवळ आलेत. समाज त्यांचा हिशेब घेईल. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले. भाजपही संपेल. भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवस वेडे होणार अशी स्थिती असल्याचेही ते यावेळी म्हणाले.